स्तनांचा कर्करोग हा फक्त महिलांना होतो, आजही अनेकांना असंच वाटतं. पण असे काहीही नाहीये, पुरुषांना सुद्धा स्तनांचा कर्करोग होऊ शकतो.
हॉलिवूड गायिका बियॉन्सेचे वडील मॅथ्यू नोल्सनेही २०२० मध्ये खुलासा केला की ते स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. bbc.co.uk या वेबसाईट वरून मिळालेल्या माहिती नुसार, गुड मॉर्निंग अमेरिका या टीव्ही शोवर मॅथ्यू यांनी आपल्या आजाराचा खुलासा केला.
पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळणे हि फार दुर्मिळ बाब आहे. विशेषतः ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या पुरुषांना हा आजार होण्याच्या संभावना जास्त असतात. पुरुषांमध्ये या आजाराची टक्केवारी अतिशय कमी असल्यामुळे याबद्दल लोकांमध्ये जागरुकता सुद्धा कमी आहे. त्यामुळे या आजाराच्या लक्षणांकडे पुरुषांकडून केले जाते आणि परिणामी स्थिती फार गंभीर होते. जेव्हा आजाराचं निदान होतं तेव्हा बऱ्याच प्रकरणांमध्ये उशीर झालेला असतो.
पुरुषांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे:
छातीवर किंवा स्थनाजवळ गाठ येणे-
जर तुमच्या छातीवर किंवा स्थनाजवळ गाठ झाली असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या गाठी सहसा दुखत नाहीत, पण जस जसा कर्करोग वाढतो तशी ही गाठ सुद्धा छातीपासून वाढत जाऊन मानेपर्यंत पोहोचते.
निप्पलचे तोंड आत जाणे-
ट्यूमर जस जसा वाढत असतो त्यासोबतच लिंगामेन्ट स्तनाच्या आत खेचले जाऊ लागतात, आणि निपल्स आतल्या बाजूला ओढले जातात. याशिवाय निपलच्या आजूबाजूची त्वचा सुद्धा रूक्ष होऊ लागते.
निप्पल डिस्चार्ज (निप्पल मधून द्रव बाहेर येणे)-
जर तुम्हाला नियमितपणे किंवा अधून मधून तुमच्या शर्ट किंवा टी-शर्ट वर कोणते डाग दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. बियॉन्सेच्या वडीलांनी सुद्धा आपल्या प्रकृतीबद्दल सांगितले की त्यांना कर्करोगाबद्दल फार उशीरा कळले. त्यांच्या शर्टवर त्यांना रक्ताचे डाग दिसू लागल्यानंतर त्यांना या आजाराबद्दल कळले, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
मुरमाप्रमाणे दिसणारी जखम-
स्तनाच्या कर्करोगातील ट्यूमर हा त्वचेवरूनच वाढत असतो त्यामुळे निप्पलवर उघडपणे घाव दिसू लागतात. हा घाव सहसा एखाद्या मुरमाएवढा असतो.
यापैकी कुठलेही लक्षणं तुम्हाला आढळल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करून चाचण्या करून घ्या.